पालकमंत्री आले अन् त्यांच्या व्यथांना लागला ब्रेक जीएमसीतील जेवणाचा दर्जा उंचावला :  प्रशासन आले रुळावर
अकोला, ता.११ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर रुग्णांकडूंन प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेऊन जेवणाची तपासणी केली. दरम्यान त्यांनी भोजनाचा दर्जा सुधारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यांच्या या सूचनेचे तत्काळ अंमलबजावणी करीत प्रशासनाने रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा उंचावल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढता आहे. ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पालकमंत्री बच्चू कडू हे सर्वच विभागाचा युद्धपातळीवर आढावा घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगले जेवण मिळत नसल्याची बाब पुढे आली होती. वार्डात वेळेवर सकाळचा चहा पोहोचत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता. हा विषय पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर जाताच त्यांनी बुधवारी (ता.१०) सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तपासला. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवली तरच कोरोनाला हरवले जाऊ शकते, असे तज्ञांच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. ही बाब लक्षात घेता रुग्णांना सकस आहार मिळणे गरजेचे असल्याची बाब पालकमंत्र्यांनी जीएमसी प्रशासनाला ळलक्षात आणून देत रुग्नांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तत्काळ सुधारण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना दिले होते. त्यानंतर प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या या आदेशाची दखल घेत गुरुवारीच (ता.११) भोजनाचा दर्जा उंचावल्याचे पहायला मिळाले. पालकमंत्र्यांनी सुचवलेले विविध बदलही जीएमसी प्रशासनाने केले आहेत. त्यामुळे आता रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.